चंद्रपूर – जंगलातील कच्च्या रस्त्यांमुळे पावसाळ्यात व्याघ्रसफारी करण्यास मोठ्या अडचणी निर्माण होतात. त्यातच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना बघता ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांसाठी मान्सून सफारी येत्या १ जुलैपासून बंद होणार आहे. पावसाळ्यात दरवर्षी हे उद्यान बंद ठेवण्यात येते. बफर झोन मात्र वर्षभर खुले राहणार असल्याची माहिती व्याघ्रप्रकल्पातील सूत्रांनी दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान ३० जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. दरवर्षी, मान्सूनचा हंगाम सुरू होताच भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्याने चार ते पाच महिन्यांसाठी बंद होतात. प्रदेशानुसार कारणे वेगवेगळी असतात. उदाहरणार्थ, देशाच्या उत्तर-पूर्वेकडे, पर्जन्यमान जास्तीत जास्त आहे आणि दरवर्षी उद्यानांना पूर येतो. देशाच्या इतर भागांमध्ये पूरस्थिती नसली तरीही पावसाळ्यात जंगलात मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि कोणत्याही वाहनांची ये-जा करणे कठीण होते. वन्यप्राण्यांना त्यांच्या प्रदेशातील अभ्यागतांपासून मुक्तपणे श्वास घेण्यासाठी थोडा वेळ हवा असतो. त्यामुळे ताडोबाच नाही तर भारतात सात ते आठ राष्ट्रीय उद्याने आहेत. प्रत्येक राज्यात वेगळं वातावरण असतं. राजस्थानमधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, आसामचे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान येथे अतिवृष्टी आणि पुराची समस्या आहे. तसेच मध्य प्रदेशमधील कान्हा राष्ट्रीय उद्यान पवसाळ्यात या भागातील रस्ते बंद होतात. त्यामुळे भारतातील सगळी प्रमुख उद्यानेदेखील पावसाळ्यामुळे बंद असणार आहे.