पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात क्लाउड किचनची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शहरात बाहेरगावाहून कामानिमित्त आणि शिक्षणानिमित्त येणाऱ्यांची संख्या वाढली असून त्यांना क्लाउड किचनच्या माध्यमातून रात्री उशिरापर्यंत जेवणाची सुविधा मिळते. दोन वेळच्या डब्यासाठी महिन्याला जवळपास १५०० रुपये आणि नाश्त्यासाठी महिन्याला जवळपास १७०० रुपये मोजावे लागतात.
पुणे, मुंबईसारख्या शहरात कर्मचारी वर्गापासून उच्चभ्रू व्यक्तींच्या रोजच्या जेवणाचा प्रश्न सोडवणाऱ्या क्लाउड किचनला खूप मागणी आहे. येथे सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सुविधा दिली जाते. विशेष म्हणजे खाद्यपदार्थ घरगुती पद्धतीने बनवले जात असल्याने तब्येतीची चिंता नसते. शिवाय योग्य बजेटमध्ये पोटा-पाण्याचा प्रश्नही सुटतो. येथून डबे घेऊन जाण्याची सुविधा असते.