पुणे – खडकवासलासह इतर धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडल्याने पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट टळले आहे. जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला नव्हता. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांमधील पाण्याची पातळी खाली गेल्याने सोमवारपासून एक दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येणार होता. मात्र गेले दोन दिवस पुण्यात आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत असून पाणीसाठ्यातदेखील वाढ झाली आहे.
खडकवासला प्रकल्पात वरसगाव, पानशेत आणि टेमघर ही धरणे येतात. या धरणांची मिळून एकूण २९.१५ टीएमसी इतकी पाणी साठवण क्षमता आहे. यापैकी शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६.९५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक पाऊस झाला आहे. यामुळे धरणांची पाणी पातळी वेगाने वाढू लागली आहे. त्यामुळे पुणेकरांवर असणारे पाणी संकट दूर होण्यास मदत होणार आहे.