पुणे- पुणे शहर काँग्रेस शहराध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आणि प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यांच्यासह रोहित टिळक यांनी राजीनामा दिला आहे.आता कोणत्याही क्षणी पुणे महापालिका निवडणूक जाहीर होणार असल्याने काँग्रेसला आता पुणे शहराला नवा शहराध्यक्ष लवकरच निवडावा लागणार आहे. काँग्रेसने केलेल्या एक व्यक्ती एक पद या निर्णयानुसार हे राजीनामे दिले असल्याचे स्पष्टीकरण बागवेंनी केले आहे.
दोन आठवड्यांपूर्वी राजस्थानमध्ये काँग्रेसचे चिंतन शिबीर पार पडले. या शिबिरात ’एक व्यक्ती एक पद’ असा ठराव करण्यात आला होता. या ठरावानुसार शिर्डीत झालेल्या महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशच्या अधिवेशनात 51 जणांनी तात्काळ राजीनामे दिले आहे. त्यात रमेश बागवे आणि प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यांच्यासह रोहित टिळक यांचाही समावेश आहे. मागील 5 वर्षांहून अधिक काळापासून छाजेड आणि टिळक पक्षाचे काम करत आहे तर बागवे यांनाही शहराध्यक्षपदी निवड होऊन 6 वर्षे झाली आहेत. त्यामुळे या सर्वांनी पक्षाच्या आदेशाचे पालन करत आपल्या पदाचे राजीनामे प्रदेश काँग्रेसकडे सादर केले आहे. बागवे यांनी राजीनामा दिल्यामुळे आता शहराध्यक्षपदावरून पुन्हा एकदा शहर काँग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या पदासाठी पक्षातील इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.