पुणे – मुंबईत आज सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे दुपारपर्यंत पाऊस कायम राहिल्यास सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. तर दुसरीकडे कोकणात धो धो पाऊस सुरू असतानाच पुण्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
बुधवारी दिवसभर पुणे शहर व परिसरात पावसाचा जोर कायम राहील, तर निवडक ठिकाणी संततधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे शहरात मंगळवारी रात्रभर सरासरी २० मिलीमीटर पाऊस पडला, तर चिंचवड परीसरात तब्बल ५४.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मान्सून दाखल झाल्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. बुधवारी पहाटे तीन वाजता हवामान खात्याने घेतलेल्या नोंदीवरून हे स्पष्ट झाले आहे.