पुणे : पुण्याच्या आंबेठाण येथे तीन बहीण भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पावसाचे पाणी साचलेल्या खड्ड्यात तिन्ही भावंड खेळण्यासाठी उतरले आणि त्यातच बुडून या तिघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राकेश, रोहित आणि श्वेता किशोर दास असे मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.
आज सकाळी आई आणि या तिघांचा सहा महिन्यांचा भाऊ घरात होता. त्यावेळी ही तिघे पावसाच्या पाण्यात खेळत होते. खेळता खेळता एका शेतातील खड्ड्यात उतरले. मात्र अंदाज न आल्यानं त्यांना बाहेर पडता आलं नाही आणि पाण्यात गुदमरुन त्यांचा जीव गेला असल्याचे समोर आले आहे. या घटनेने सगळीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकदा शेतात कामांसाठी खोदलेले खड्डे काम झाल्यानंतरही तसेच ठेवले जातात. पावसाळ्यात या खड्यात पाणी साचते. त्यामुळे खड्याचा अंदाज घेता येत नाही. त्यात मुलांचे वय लहान असल्याने त्यांना या सगळ्याची कल्पना आली नसल्यामुळे खेळण्यासाठी गेलेले हि तीन मुले आपला जीव गमावरून बसली. या घटनेनंतर शेतात खड्डे असल्यास ते बुजवून अथवा त्या बाजूला कुंपण करण्याचं आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केले आहे.