नागपूर – भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषद घेतली होती. त्यांना पत्रकार परिषद घेऊ देता, मग आम्हालाही घ्यायची आहे, असे म्हणत नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात गोंधळ घातला. राजकीय पोलीस आयुक्तालयात पत्रकार परिषद घेतात कसे, असा उपस्थित करत धोटे यांनी भाजपाच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
ज्वाला धोटे या शनिवारी काही पदाधिकार्यांसोबत पोलीस आयुक्त कार्यालयात पोहचल्या. यावेळी त्यांनी भाजपाने पत्रकार परिषद घेतलेल्या सहाव्या मजल्यावर कॉन्फरन्स हॉलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना महिला पोलीस कर्मचार्यांनी मज्जाव केला. तेव्हा पोलीस आणि ज्वाला धोटे यांच्यात शाब्दिक वाद झाला.ज्वाला धोटे म्हणाल्या की, पोलीस भवन हे प्रशासकीय इमारत असताना राजकीय पक्षाला पत्रकार परिषद घेण्यास का थांबवले नाही. जर मला आतमध्ये निवेदन देऊन पत्रकार परिषद घेऊ शकत नाही, तर राजकीय नेत्यांवर गुन्हा दाखल करावा. त्यांना परवानगी देणार्या पोलीस अधिकार्यावर गुन्हा दाखल करावा. जर दोन दिवसांत गुन्हा दाखल झाला नाही, तर पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करू. तसेच, पाणी त्याग करण्याचा इशाराही ज्वाला धोटे यांनी दिला आहे.