पोलीस नेत्यांना सॅल्युट करू लागले! – जयश्री खाडिलकर-पांडे

भारतात अजब स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासन आणि पोलीस यांच्यापेक्षा नेता मोठा ठरू लागला आहे. नेत्यांच्या आदेशानुसार आणि मनमानी विचारांनुसार प्रशासन आणि पोलीस धावताना दिसत आहेत. केंद्रात हेच चित्र आहे आणि राज्यांमध्येही तीच स्थिती आहे. लोकशाही यंत्रणेपेक्षा नेता मोठा मानला जाऊ लागला की अधोगती सुरू होते. एका व्यक्तीचा निरंकुश मनमर्जी कारभार हा नेहमी समाजाला रसातळाला नेतो. या स्थितीत न्यायालय आणि निवडणूक हे दोनच लगाम हाती असतात. पण भारतात न्यायालयेही निर्णायक भूमिका घेताना दिसत नाही आणि निवडणूक हा निव्वळ पैशाचा खेळ झाला आहे.

काँग्रेसपासून भाजपापर्यंत राष्ट्रीय पक्षांनी सीबीआय आणि इडी यांचा कठपुतळीप्रमाणे वापर सुरू केला आहे. मुद्यावरून गुद्यावर येणे जितके वाईट तितकेच मुद्यावरून मुस्कटदाबीपर्यंत पोचणे भयंकर आहे. विरोधकांच्या मागे ससेमिरा लावून त्यांना त्यातच गुंतवून ठेवायचे, वाटेल तसे आरोप करून इतकी मानहानी करायची की सत्याचा उजेड पडेपर्यंत अंधारातच गुदमरून प्राण जावा, जे विरोधकांवर आरोप करण्यास तयार असतील त्यांना मर्यादेबाहेर संरक्षण देऊन त्यांना अवास्तव महत्त्व द्यायचे हे प्रकार केंद्र सरकार करीत आहे. नेत्यांच्या मागे लावलेला इडीचा ससेमिरा, बिहार निवडणुकीपूर्वी बिहारी अभिनेता सुशांत राजपूत यांच्या मृत्यूच्या चौकशीचे महानाट्य, कंगना, सोमय्या आणि नारायण राणेंना दिलेले संरक्षण हे सर्व असामान्य आहे. कायदा आणि नितीमत्ता सोडून सुरू झालेले राजकारण आहे.

केंद्र सरकार जे करते आहे तेच महाराष्ट्र सरकार करते आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या विरोधात कुणीही बोलले की, संपूर्ण पोलीस यंत्रणा मागे लावायची असा प्रकार सुरू आहे. अर्णव गोस्वामीला पहाटे उचलला, किरीट सोमय्यांना कोल्हापूरचे पोलीस मुंबईत येऊन नोटीस देतात आणि त्यांना घरात डांबण्याचा प्रयत्न होतो, परमवीर सिंह परागंदा झाले अशी त्यांच्यावर वेळ आणली, रश्‍मी शुक्लांना दिल्लीत आश्रय घ्यावा लागला, मुंडेंवर आरोप करणाऱ्या करुणाच्या गाडीत पिस्तुल सापडली आणि ती कोठडीत आहे, सरकारला सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली नाहीत तो हे प्रकार घडले. त्याचवेळी सरकारचा वरदहस्त कुणावर आहे?

अनिल देशमुख, अनिल परब, प्रताप सरनाईक, वरुण सरदेसाई, हसन मुश्रीफ अशा सर्वांना सरकारचा पाठिंबा आहे. देवेंद्र फडणवीस सरकार होते तेव्हा त्यांनी पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता या सर्वांना क्लीनचीट दिले आणि त्यानंतर पक्षाने या सर्वांना बाजूला सारले. या नेत्यांच्या राजकीय जीवनात वादळ का आले? त्याचे उत्तर देवेंद्र फडणवीसांनी कधीही दिले नाही. आता ठाकरे-पवार सरकार त्याच मार्गाने जात आहे. त्यासाठी आधीच्या महाराष्ट्र सरकारने आणि आताच्या महाराष्ट्र सरकारने पोलिसांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांना गुलाम बनवले आहे. आम्ही सांगतो तेच करायचे हा संदेश वरून खालपर्यंत देण्यात आला आहे. पोलिसांनी सकाळी उठायचे आणि नेत्याला सलाम ठोकायचा हे वास्तव बनले आहे. आजवर सामान्य जनता पोलीस स्थानकाची पायरी चढायला घाबरत होती. आता पोलीस नेत्याच्या बंगल्याची पायरी चढायला घाबरतात. कायदा बाजूला सारला गेला की भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजते. केंद्रापासून राज्यांपर्यंत हेच चित्र आहे. याचा पुढचा अध्याय म्हणजे रस्त्यावर खुलेआम हत्या, दंगल, मारामारी, शिवीगाळ सुरू होणार आहे. हे लवकरच घडेल. तालिबान्यांचा दहशतवाद हा शस्त्रास्त्राने सुरू आहे. स्वत:ला सुसंस्कृत म्हणवणाऱ्या भारतात कायद्याच्या चिंधड्या उडवून दहशतवाद सुरू आहे. दोन्हीची सुरुवात नेत्यांमुळे झाली आहे. दोन्हीचा अंत जमावाचा उठाव होऊन लोकशाहीच्या स्थापनेनेच होईल.

Share with :
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on pinterest
Pinterest
Share on linkedin
LinkedIn
Close Bitnami banner
Bitnami