मुंबई – पाऊस लवकर येणार म्हणून शेतकऱ्यांनी पेरणीची कामेही आटोपून घेतली. मात्र आता वेळेआधी दाखल होणारा मान्सून रेंगाळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पुन्हा एकदा मान्सूनची तारीख पुढे गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सून कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमाभागात रेंगाळला असून त्याला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास १२ ते १३ जूनच्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता आहे. यापूर्वी तो ७ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला होता.
दरम्यान, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांत ढगाळ वातावरण कायम आहे. अधूनमधून सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडतो, तर दुसरीकडे विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. मात्र तरीही विदर्भातील काही भागांत पुढील दोन-तीन दिवसांत मान्सूनपूर्व पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा मान्सून लवकर दर्शन देणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र आता मान्सून राज्यात १२ ते १३ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे.