मुंबई- आरे मेट्रो कारशेडच्या विरोधात पर्यावरणवादी पुन्हा एकवटले आहे. संतप्त आंदोलकांनी आम्ही प्रत्येक रविवारी सरकारच्या विरोधात आंदोलन करू असा पवित्रा घेतला आहे.आरे जंगल वाचले पाहिजे, आरेला जंगल घोषित करा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. कांजूरमार्ग येथील जागा ही मेट्रो-३सह, मेट्रो ४, मेट्रो ६ आणि मेट्रो १४ साठीदेखील फायदेशीर ठरणार असल्याचे दावा आरे बचाव कार्यकर्त्यांनी केला. या आंदोलनात पर्यावरण प्रेमी, आरे तील निवासी,मुंबईकरही सहभागी झाले होते. आरे येथील पिकनिक पॉईंट या आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.
महाविकास आघाडी सरकारने आरे कारशेडला स्थगिती दिली होती. शिंदे- फडणवीस हे सत्तेत आल्यावर त्यांच्याकडून स्थगिती उठवण्यात आल्यामुळे आता सरकार आणि पर्यावरणवादी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. आरे हे जंगल १,८००एकर वनक्षेत्र वसलेले आहे. ‘मुंबईचे फुफुस’ म्हणून ओळख जाते. आरेच्या जंगलात बिबट्यांशिवाय जवळपास ३०० प्रजातींचे प्राणी आढळतात. आरे मेट्रो कारशेडमुळे ही जैवविविधता नष्ट होईल अशी भीती पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली जात आहे. या आंदोलनाला शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मागच्या रविवारी झालेल्या आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला होता.