मुंबई- संजय राऊत यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे प्रवीण राऊत यांना चौकशीसाठी दिल्लीतील कार्यालयात नेण्यास विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडीला परवानगी दिली. त्यामुळे त्यांच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे होण्याची अपेक्षा ईडीला आहे.
गोरेगाव भूखंडाच्या विक्रीतील एफएसआय गैरव्यवहार प्रकरणी उद्योजक प्रवीण राऊतला ईडीने अटक केली आहे. एचडीआयएल रियल इस्टेट या कंपनीमार्फत पत्राचाळ जमीन प्रकरणात १००० कोटींहून अधिक गैरव्यवहार झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. प्रवीण राऊत पालघरच्या सफाळेतील बांधकाम व्यवसायिक आहे. मनीलॉन्डिंगचा गुन्हा दाखल झाल्यावर ईडीने त्यांना अटक केली. तेव्हापासून ते आर्थर रोड कारागृहात आहेत. सखोल चौकशीसाठी त्यांना दिल्लीला नेण्याची गरज असल्याचे ईडीने मंगळवारी विशेष न्यायालयाला सांगितले. त्यानुसार न्यायालयाने त्यांना चौकशीसाठी दिल्लीला नेण्याची परवानगी दिली. कोर्टाच्या या निर्णयामुळे प्रवीण राऊत यांच्याबरोबरच संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.