संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 17 August 2022

प्रसिद्ध काळू धबधब्यात जीवघेणा प्रसंग मुंबईच्या दोघांना शिवनेरी ट्रेकर्सने वाचवले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जुन्नर- वर्षा विहारासाठी सध्या मुंबई, पुणे तसेच इतर राज्यातील पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, धबधब्यांना भेट देत आहेत. काही अतिउत्साही तरुण-तरुणी धाडस दाखवून आनंद लुटण्याचा प्रयत्न करीत असतात.नेमके तेच धाडस त्यांच्या जिवावर बेतत आहे.रविवारी ३१ जुलै रोजीही असाच जीवघेणा प्रसंग मुंबईतील दोन पर्यटकांवर बेतला होता. मात्र शिवनेरी ट्रेकर्सच्या सदस्यांनी त्यांना जीवदान मिळवून दिले.
जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटात खिरेश्वर आणि मुरबाडच्या थितबी दरम्यान काळू धबधबा परिसरात नदीपात्रात रविवारी मुंबईचे सुमारे ५० पर्यटक उतरले होते.यापैकी ४ तरुणी आणि १ तरुण हे धोकादायक स्थितीत पाण्याच्या मुख्य प्रवाहात उतरले होते. २० ते २५ वयोगटातील हे तरुण-तरुणी होते.धबधबा ज्याठिकाणी १२०० फूट खाली कोसळतो तेथे १५ ते २० फूट अंतरावर पाण्यात उतरून पर्यटक वर्षा विहाराचा आनंद घेत होते. त्यावेळी पाण्याचा वेग अचानक वाढल्याने आणि पाण्यातील शेवाळल्या दगडावरून पाय घसरून त्यातील एक तरुण व तरुणी वाहून जावू लागले. पण प्रसंगावधान दाखवत शिवनेरी ट्रेकर्सने त्यांचे प्राण वाचविले.पारगाव मंगरूळ येथील शिवनेरी ट्रेकर्सचे सदस्य सागर चव्हाण, अतुल रसाळ व स्वप्नील तट्टू हे सेफ्टी केबल लावण्यासाठी गेले असताना त्यांनी काळू नदीपात्रात जवळ असलेल्या मुंबईचे पर्यटक पात्रात न उतरण्याचा सल्ला दिला. मात्र पर्यटकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ज्याठिकाणी धबधबा कोसळतो तेथे खोल खड्ड्यात पडून तरुण-तरुणी वाहून जात होते. त्यावेळी रसाळ, तट्टू व सागर चव्हाण यांनी प्रसंगावधान दाखवत त्यांचा जीव वाचवला.या तरुणांनी हे धाडस दाखवले नसते तर ते पर्यटक १२०० फूट खोल दरीत कोसळले असते व मोठा अनर्थ घडला असता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami