मुंबई- शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील वाद आता रस्त्यावर आलेला आहे. मानखुर्द येथील शिवसेना शाखेवर असलेल्या फलकावरून राहुल शेवाळे यांचे नाव हटवल्यामुळे शाखाप्रमुखावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी शाखाप्रमुख किसन टिकेकर मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी बंडखोरी करून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या फलकावरून राहुल शेवाळे यांचे नाव आणि फोटो काढून टाका असा आदेश शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिला आहे. त्यानुसार मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या नजीक असलेल्या शिवसेना शाखे बाहेर जो फलक होता त्यावरून राहुल शेवाळेंचे नाव आणि फोटो हटवण्यात आले. त्यामुळे शाखाप्रमुख किसान टिकेकर याना राहुल शेवाळेंच्या समर्थकांनी जाब विचारला यावेळी वरिष्ठांच्या आदेशाने हि कारवाई करण्यात आल्याचे टिकेकरांनी सांगितले. त्यावर तुमच्यावर प्राणघातक हल्ला होणार आहे अशी धमकी एका अज्ञाताने त्यांना दिली. त्यानंतर या प्रकरणी टिकेकर यांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे . मात्र या घटनेमुळे शेवाळे समर्थक आणि शिवसेना कार्यकर्ते यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.