संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 17 August 2022

बंडखोर खा. धैर्यशील मानेंच्या घरावर
हजारो संतप्त शिवसैनिकांनी नेला मोर्चा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर – कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसेना जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेचा भव्य मोर्चा खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर काढण्यात आला. हजारो शिवसैनिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. हातात शिवसेनेचे भगवे झेंडे घेऊन शिवसैनिकाचा मोर्चा मार्केट यार्डमधून काढण्यात आला होता. ‘गली गली मै शोर है, धैर्यशील माने चोर है’ अशा जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. पोलिसांचे बॅरिकेट्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार्‍या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून धैर्यशील माने शिवसेनेत सहभागी झाले होते.
कोल्हापूरच्या हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनीही शिंदे गटाला आपला पाठिंबा दिल्यानंतर कोल्हापुरात शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली. ही नाराजी आज कोल्हापूरच्या रस्त्यांवर दिसून आली. शिवसेनेचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांनी धैर्यशील मानेंच्या घरावर मोर्चा काढला. यावेळी खासदारसाहेब, तुम्ही उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? सांगा शिवसैनिकांचं काय चुकलं?,असे प्रश्‍न विचारत घोषणाबाजी करण्यात आली. तेव्हा मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मानेच्या घराभोवतीही पोलीस तैनात ठेवण्यात आले होते. त्यांच्या घराकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बंद केले होते.पोलिसांनी माने यांच्या निवासस्थानाच्या 200 मीटर परिसरात जमावबंदी लागू केली आहे. शिवसैनिक मानेंच्या घरी पोहोचण्याआधीच शिवसैनिकांना पोलिसांनी अडवले. आक्रमक शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी म्हटले आहे की, खासदार धैर्यशील माने यांना शिवसेनेनं पाठबळ दिले. प्रवक्ता पदासह सर्वकाही देऊनही त्यांनी ठाकरे कुटुंबाशी गद्दारी केली आहे. याचा जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरावर व कार्यालयावर मोर्चा काढला आहे. आज जरी माने आम्हला भेटले नाही तरी आम्ही पुन्हा त्यांना अशाप्रकारे जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. कोल्हापूर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या चिन्हावर लढवली, पण त्यांनी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी करून घाणीत उडी मारली. त्यांच्या हिम्मत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी आणि निवडून यावे, असं शिवसेना जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी थेट आव्हान माने यांना दिले आहे. खासदार माने सध्या दिल्ली येथे असून या मोर्चाला विरोध करू नका, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मोर्चाला विरोध न करण्याचे आवाहन सोशल मीडियातून त्यांनी केलं आहे. धैर्यशील माने यांनी आपली भूमिका मांडताना शांततेचं आवाहन केलं आहे. शिवसेनचे काही पदाधिकारी भावनाविवश झाल्यामुळं त्यांचा होणारा आक्रोश व संवेदना मी शिवसैनिक म्हणून समजू शकतो. याच उत्तर घेण्यासाठी काढण्यात येणार्‍या मोर्चाला कुठल्याही प्रकारचा विरोध होता कामा नये. मोर्चामध्ये सहभागी होणारा प्रत्येकजण हे आपलेच बंधू-भगिनी आहेत. त्यांचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे हे त्यांचा सहकारी म्हणून माझं कर्तव्य असल्याचे धैर्यशील माने यांनी म्हटलं आहे. मी शिवसैनिकांना पडलेल्या सर्व प्रश्‍नांची उत्तर देण्यासाठी सर्व प्रश्नांची उत्तरे देणार असल्याचे त्यांनी आपल्या सगळ्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami