नवी दिल्ली- आधी आमदार फुटले आणि सरकार पडले. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस यांचे नवे सरकार आले. त्यानंतर ठाकरेंकडील एकापाठोपाठ एक खासदारही फुटू लागले आणि तब्बल 12 खासदार हे शिंदे गटात सामील झाले. आधीच आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ठ असताना, आता उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा आणखी एक प्रयत्न केला आहे. शिंदेंसोबत गेलेल्या 12 खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी शिवसेनेना खासदार संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता लोकसभा अध्यक्ष या प्रकरणावर काय निर्णय घेतात? याकडे सवार्र्ंचे लक्ष लागले आहे.
शिवसेना खासदार राऊत यांनी आज दुपारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. राऊतांनी या भेटीत लोकसभा अध्यक्षांना पत्राद्वारे 12 बंडखोर खासदारांच्या निलंबनाची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेची साथ सोडत 12 खासदारांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. दिल्लीत 19 जुलैला दुपारी शिवसेनेच्या राहुल शेवाळे, भावना गवळी, कुपाल तृपाणे, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, प्रतापराव जाधव, संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील, श्रीरंग बारणे, राजेंद्र गावित आणि डॉ. श्रीकांत शिंदे या 12 खासदारांची ओम बिर्ला यांच्यासोबत बैठक पार पडली होती. या बैठकीत ओम बिर्ला यांना राहुल शेवाळे आणि भावना गवळी यांच्या अनुक्रमे गटनेता आणि प्रतोदपदी नियुक्तीबाबत पत्र देण्यात आले होते. यानंतर बिर्ला यांनी त्याला मान्यता दिली होती. त्यानंतर आता राऊतांनी या 12 खासदारांना निलंबित करण्यासंदर्भात मागणी केली आहे.