मुंबई- सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा आपल्या विमा शाखा इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स कंपनीतील १२.५ टक्के हिस्सेदारी आयपीओ किंवा इतर माध्यमातून विकणार आहे. या कंपनीत बँकेची ६५ टक्के हिस्सेदारी आहे. ती या व्यवहारानंतर कमी होईल. मात्र ५१ टक्क्यांपेक्षा कमी होणार नाही.
बँक ऑफ बडोदाच्या संचालक मंडळाची शनिवारी बैठक झाली. त्यात विमा कंपनीच्या प्रस्तावित निर्गुंतवणूक धोरणांतर्गत त्यातील १२.५ टक्के हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आयपीओ किंवा इशू ऑफर ऑफ सेलद्वारे ही भागीदारी विकण्यात येणार आहे. इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स ही बँक ऑफ बडोदाची उपकंपनी आहे. या कंपनीत कार्मेल पॉईंट इन्वेस्टमेंट इंडियाची २६ टक्के हिस्सेदारी आहे. युनियन बँक ऑफ इंडिया ही कंपनीची ९ टक्के भागिदारी असलेली तिसरी धोरणात्मक भागीदार आहे. नुकत्याच संपलेल्या तिमाहीत बँक ऑफ बडोदाला नफा झाला होता आणि त्यांचा एनपीए कमी झाला आहे.