जम्मू : जम्मू – काश्मीरमधील बारमुल्ला जिल्ह्यातील वानिगम बाला भागात शनिवारी ३० जुलै रोजी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. ह्या चकमकीत १ दहशतवादी ठार तर सुरक्षा दलाचे २ जवान जखमी झाले आहेत.राज्य पोलीस, सीआरपीएफ आणि भारतीय लष्कराच्या जवानांकडून परिसरात नाकाबंदी करत दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू आहे.
बारामुल्ला जिल्ह्यातील क्रीरी भागातील वानिगाम बाला याठिकाणी दोन दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घालत शोध मोहीम सुरू केली,अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. शोध मोहिमेदरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला, त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एका दहशतवाद्याला ठार केले.
यापूर्वी ६ जुलै रोजी कुलगाम जिल्ह्यातील हदिगाम भागात सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक झाली होती. यावेळी काश्मीर झोन पोलिसांनी दहशतवाद्यांकडून शस्त्र आणि स्फोटके जप्त केली होती. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात ११ जुलै रोजी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदचा एक कुख्यात दहशतवादी मारला होता. तो जैश-ए-मोहम्मदचा कमांडर होता आणि २०१८ पासून राज्यात सक्रिय होता.