बीड – जिल्ह्यावर भर पावसाळ्यात पाणीसंकट घोंगावत आहे.जिल्ह्यातील १४४ लहानमोठ्या पाणीसाठ्या प्रकल्पांपैकी ८४ प्रकल्प मृतसाठ्यात गेले आहेत. सर्व पाणी प्रकल्पांत एकूण २४ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा सुरू झाला आहे. मात्र अद्यापही धरणे तहानलेलीच आहेत.
शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.बीडमध्ये पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील असणाऱ्या प्रकल्पामधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात आटला आहे.
गेल्या महिनाभरामध्ये जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, गेवराई, परळी, अंबाजोगाई, गेवराई, बीड यासह इतर काही भागामध्ये पाऊस झाला आहे. मात्र अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही.त्यामुळे धरणे कोरडी पडू लागली आहेत. दरम्यान जिल्ह्यातील १३६ पैकी ३६ पाणीसाठा प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. २० प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक पाणी उपलब्ध आहे. तर केवळ २ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणी शिल्लक आहे. जुलै महिन्यात पाऊस झाला नाही, तर उपलब्ध असलेला पाणीसाठा कमी होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यावर पाणी संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता जिल्हावासीयांना मोठ्या पावसाची नितांत गरज आहे. पाऊस आला नाही तर पिके जळून जातील. अशी चिंता शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.तसेच पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.