नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि देशातील पहिली ‘हाय स्पीड रेल्वे’ म्हणजे बुलेट ट्रेन प्रकल्पात आलेल्या अडचणींमुळे तो रखडला. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद या १.६ लाख कोटींच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या खर्चात सुमारे २० हजार कोटींची वाढ झाली आहे. त्यामुळे तो १.८ लाख कोटींवर जाण्याची शक्यता आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २०१५ मध्ये १.६ लाख कोटी खर्च अपेक्षित होता. आता २०२२ साल उजाडले आहे. दरम्यानच्या काळात कोरोना व भूसंपादनासह इतर काही अडचणी आल्या. त्यामुळे प्रकल्पाचे काम रखडले. परिणामी त्याच्या खर्चात वाढ झाली आहे. या प्रकल्पात भूसंपादनासाठी अपेक्षेपेक्षा जास्त खर्च झाला. त्याबरोबरच सिमेंट, पोलाद आणि बांधकामासाठी लागणाऱ्या अन्य कच्च्या मालाच्या दरातही मोठी वाढ झाली. यामुळे त्याचा खर्च २० हजार कोटींनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा प्रकल्प १.८ लाख कोटींच्या घरात जाणार आहे. ५०८ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होणार होता. मात्र आतापर्यंत केवळ दादर आणि नगर हवेलीत १०० टक्के भूसंपादन झाले आहे. गुजरातला ९८.९ टक्के आणि महाराष्ट्रात ७३ टक्के भूसंपादन झाले आहे. महाराष्ट्रातील भूसंपादनासाठी लागणारा वेळ हा प्रकल्प लांबण्याचे मुख्य कारण आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. या सर्व प्रकारांमुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या खर्चात सुमारे २० हजार कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे.