लंडन – ब्रिटनच्या ४० खासदारांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे जॉन्सन यांचे पंतप्रधानपद टिकून राहणार की जाणार याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र आता अखेर बोरिस जॉन्सन हे पंतप्रधानपदी टिकून राहणार, यावर शिक्कामोर्तब झाला आहे. जॉन्सन यांनी २११ विरुद्ध १४८ मतांनी अविश्वास ठराव जिंकला असून आपले पंतप्रधानपद कायम ठेवले. या ठरावात एकूण ३५९ मते नोंदवण्यात आली. यामधील २११ खासदारांनीबोरिस जॉन्सन यांच्यावर विश्वास दाखवला.
कोरोना लॉकडाऊनमध्ये १९ जून २०२० रोजी बोरिस जॉन्सन यांच्या वाढदिवसानिमित्त डाऊनिंग स्ट्रीटमध्ये त्यांच्या पत्नी कॅरी जॉन्सन यांच्यानी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत ३० लोक सहभागी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. लॉकडाऊनमध्ये दोनपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई होती, त्यामुळे या पार्टी प्रकरणाला ‘पार्टीगेट’ असे नाव देण्यात आले होते. यावरूनच जॉन्सन यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यानंतर त्यांच्याच पक्षातील ४० खासदारांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बोरिस जॉन्सन, त्यांची पत्नी आणि इतरांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. याबाबत जॉन्सन यांनी पहिल्यांदा सरकारी सूचनांचे पालन केल्याचा दावा केला होता. मात्र नंतर त्यांनी या प्रकरणी दंडाची रक्कम भरून माफी मागितली होती. तरीही विरोधकांसह सत्ताधारी खासदार आक्रमक झाल्याने जॉन्सन यांचे पंतप्रधानपद संकटात आले होते. त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती.