लंडन – ब्रिटनमध्ये जून महिन्यातील महागाई दर ९.४ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या या आकडेवारीनुसार, हा मागील ४० वर्षांतील सर्वाधिक महागाई दर आहे.
ब्रिटनच्या सीपीआय निर्देशांकात जून २०२१ मध्ये ०.५ टक्क्यांनी वाढ झाली होती. तर, जून २०२२ मध्ये ०.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सने (ओएनएस) ही माहिती दिली आहे. इंधन दर आणि अन्नधान्याच्या किंमती वाढल्यामुळे महागाई दरात वाढ झाली आहे, असे ओएनएसचे मुख्य अर्थतज्ज्ञ ग्रॅण्ट फिट्जनर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, इंग्लंडची मध्यवर्ती बँक असलेल्या बँक ऑफ इंग्लंडने वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी आपला व्याजदर वाढवून १.२५ टक्के केला आहे. हा २००९ नंतरचा सर्वाधिक दर आहे. तसेच ऑक्टोबरमध्ये महागाई दर ११ टक्क्यांहून अधिक होण्याचा अंदाज बँकेने वर्तविला आहे. तसेच जपान आणि कॅनडा या देशांचाही महागाई दर ब्रिटनच्या आसपास असण्याची शक्यता आहे. मात्र तो अद्याप जाहीर झालेला नाही.