हैदराबाद – तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये भाजपाने घेतलेल्या कार्यकारिणी बैठकीनंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री केसीआर ऊर्फ के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. मागील काही वर्षांपासून केवळ भारताचाच रुपया आंतरराष्ट्रीय बाजारात कसा गडगडत चालला आहे? रुपयाचे अवमूल्यन अमेरिकन डॉलरच्या तुलनेत तब्बल ८० रुपये इतके झाले आहे. भारताच्या इतिहासात असे कधी घडले नव्हते, हे लोकतंत्र आहे की षड्यंत्र?, असा सवालच केसीआर यांनी मोदींच्या केंद्र सरकारला केला आहे.
मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, शुक्रवारी करन्सी आंतरराष्ट्रीय चलन बाजारात रुपयाचे मूल्य ७९.२६ इतके होते. मोदीजी, मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते, त्यावेळी रुपया घसरत चालला होता, तेव्हा तुम्ही गळा फाटेपर्यंत मोठमोठ्याने ओरडत होता. परंतु आज रुपयाची किंमत काय आहे? याचे उत्तर द्या. भारताच्या इतिहासात रुपयाने सर्वात निच्चांकी किंमत गाठली आहे. हे कोणत्याही पंतप्रधानाच्या काळात झाले नव्हते. हे देशाला शोभादायक नाही. हा आपल्या महान कारभाराचा परिणाम आहे. मला हे सांगा, नेपाळचा रुपया घसरत नाही, बांगलादेशचा रुपया घसरत नाही. मग भारताच्या रुपयाचीच अशी घसरण का होतेय? याचे आधी उत्तर द्या. केसीआर यांनी यावेळी जस्टीस परडीवाला आणि जस्टीस सुर्यकांत यांचे कौतुक केले. भारताला सध्याच्या वाईट काळातून बाहेर काढण्यासाठी यांसारखे न्यायाधीश हवे आहेत. कर्नाटकच्या न्यायाधीशांना भाजपाकडून धमक्या येत असल्याचा आरोप यावेळी केसीआर यांनी केला. त्यांनी नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावरून भाजपावर टीका केली. शर्मा यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले, तरीही भाजपाने उलट निवृत्त न्यायाधीशांकडून पत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयालाच जाब विचारला. त्यांच्याविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली.