नवी दिल्ली – भारतात लवकरच अंतराळ पर्यटन शक्य होईल, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो अंतराळ पर्यटनासाठी स्वदेशी क्षमता विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, अंतराळ पर्यटन सध्या प्रचंड महागडे आहे. यंदा एप्रिलमध्ये अमेरिकन कंपनी एक्झियम स्पेसने ३ व्यावसायिकांना आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनची सफर घडवून आणली. त्यावेळी एका प्रवाशाकडून सुमारे ४२० कोटी रुपये वसूल करण्यात आले, असे कळते आहे.
पत्रकार परिषदेत मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले होते की, या वर्षाच्या अखेरीस दोन चाचण्या घेण्यात येणार आहेत. पहिल्या चाचणीत मानवरहित वाहन अवकाशात पाठवले जाईल. तर दुसऱ्यांदा हे वाहन रोबोटसह अंतराळात जाणार आहे. या रोबोला ‘व्योमित्र’ असे नाव देण्यात आले आहे. चाचणीच्या निकालांचे विश्लेषण केल्यानंतर इस्रो मानवी अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्याबाबत अंतिम निर्णय घेईल. दरम्यान, राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात जितेंद्र सिंह यांनी असेही सांगितले होते की, इस्रोने अंतराळ घडामोडींच्या विविध क्षेत्रात ६१ देशांशी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संबंध पुढे नेले आहेत.