नवी दिल्ली – आयएनएस विक्रांतची रविवारी 10 जुलै रोजी चौथी आणि अखेरची चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे. त्यामुळे भारतीय नौदलाच्या सागरी शक्तीत वाढ झाली आहे.आयएनएस विक्रांत ह्या स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका नौदलात दाखल होण्यासाठी सज्ज झाल्या असून भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात मोलाची भर पडली आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस आयएनएस विक्रांत नौदलाकडे सुपूर्द केली जाईल.
येत्या 15 ऑगस्टला आयएनएस विक्रांत नौदलाच्या सेवेत दाखल करत ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. आयएनएस विक्रांतला भारतीय नौदल आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांनी संयुक्तपणे भारतातच डिझाइन केले आणि तयार केले आहे. विक्रांतमध्ये 14 डेक म्हणजेच 14 मजले आहेत. यावर 30 ते 40 विमाने बसवता येत असून विक्रांतचे वजन 40 हजार टन आहे. आयएनएस विक्रांत 262 मीटर लांब तर 59 मीटर इतकी उंच आहे.
विक्रांत या एअर क्राफ्टच्या पहिल्या सागरी चाचण्या ऑगस्ट 2021 मध्ये यशस्वीपणे पूर्ण झाल्या. यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये दुसरी आणि जानेवारी 2022 मध्ये तिसरी अशा तीन समुद्री चाचण्या पूर्ण झाल्या, आता रविवारी 10 जुलै 2022 ला चौथी चाचणीही यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.