पंढरपूर – आषाढी एकादशीला जेमतेम महिना बाकी असून दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधमुक्तीनंतर यंदा पहिल्यांदाच पंढरीची वारी होणार असल्याने भाविकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. महत्त्वाचे म्हणजे यंदा भाविकांना पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या गाभाऱ्यातील कीर्तन सोहळा घरबसल्या पाहता येणार आहे. ‘झी टॉकीज’ वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी आषाढवारीची ही विशेष भेट आणली आहे.
आषाढ महिन्याची सुरुवात झाली की, विठुरायाच्या भक्तांना पंढरीचे वेध लागतात. हीच बाब लक्षात घेऊन ‘गजर कीर्तनाचा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरातील गाभाऱ्यातून थेट कीर्तनाचा आस्वाद झी टॉकीज प्रेक्षकांना देणार आहे. आषाढ वारी आणि आषाढ एकादशी या दोन विशेष दिनाचे औचित्य साधत ह.भ.प शंकर महाराज शेवाळे यांचे कीर्तन रंगणार आहे. झी टॉकीजवर सोमवार, २० जून रोजी सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत आणि शनिवार, १० जुलै रोजी सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत हा अनोखा कीर्तन सोहळा प्रक्षेपित होणार आहे.
दरम्यान, गेली पाच वर्षे सातत्याने भक्ती आणि प्रबोधनाचा आगळा मेळ साधत झी टॉकीजने ‘गजर कीर्तनाचा’ या कार्यक्रमाद्वारे आपल्या प्रेक्षकांच्या दिवसाची सुरुवात मंगलमय करण्याचा प्रयत्न केला आहे.