मुंबई- भिवंडी, पनवेल, मीरा-भाईंदरसह राज्यातील ९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहेत. त्यावर २२ ऑगस्टपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. त्यानंतर २ सप्टेंबरला अंतीम मतदार यादी प्रसिद्ध होईल. ३१ मे २०२२ रोजीच्या विधानसभा मतदार संघातील याद्या यासाठी निवडणूक आयोगाने ग्राह्य धरल्या आहेत.
कोरोनामुळे राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्या घेण्याच्या हालचाली निवडणूक आयोगाने वेगाने सुरू केल्या आहेत. त्यात महाराष्ट्रातील भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर, औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर आणि नांदेड-वाघाळा या ९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑगस्टला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. २२ ऑगस्टपर्यंत त्यावर हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत आहे. निवडणूक आयोगाने तयार केलेल्या आणि ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या यासाठी ग्राह्य धरल्या आहेत. या मतदार याद्या प्रभागनिहाय विभाजित केल्यावर १३ ऑगस्टला प्रारूप स्वरूपात त्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. २२ ऑगस्टपर्यंत सूचना आणि हरकती दाखल करायच्या आहेत. त्यानंतर २ सप्टेंबर २०२२ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या याद्यांमध्ये मतदारांची नावे आणि पत्ते कायम आहेत. त्यात नवीन नावाचा समावेश केला जात नाही. नावे वगळणे किंवा नावे आणि पत्त्यामध्ये दुरुस्तीही केली जाणार नाही. प्रभाग बदलला असेल तर त्यात दुरुस्ती करता येते, असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.