मुंबई – लोकप्रिय महाभारत मालिकेत नंदची भूमिका साकारणारे अभिनेते रसिक दवे यांचे शुक्रवारी रात्री ८ वाजता मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. किडनीच्या विकाराने त्रस्त असलेल्या दवेंवर रुग्णालयात उपचार सुरू होते. २ वर्षांपासून ते डायलिसिसवर होते. एक महिन्यापासून आजार बळावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांचे निधन झाले.
रसिक दवे यांनी महाभारतबरोबरच ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ आणि ‘बालिका वधू-२’ या मालिकांमध्येही काम केले होते. त्यांनी अनेक गुजराती चित्रपटांमध्येही भूमिका केल्या होत्या. त्यांच्या पश्चात पत्नी केतकी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. रसिक आणि केतकी गुजराती थिएटर कंपनी चालवत होते. १९८२ मध्ये रसिकने गुजराती चित्रपटांतून कारकीर्द सुरू केली. २००६ मधील ‘नच बलिये’ या टीव्ही शोमध्ये केतकी आणि रसिक यांनी भाग घेतला होता.