नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सातारा जिह्याचे सुपूत्र आणि मेघालय उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रणजित मोरे यांची केंद्रीय प्रशासकीय लवादाच्या (कॅट) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोरे यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. सातार्यातील खटाव तालुक्यातील निमसोड हे रणजित मोरे यांचे मूळ गाव आहे. या नियुक्तीबद्दल सातार्यातील वकील वर्गातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
रणजित मोरे यांचे प्राथमिक शिक्षण निमसोड येथे झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते कोल्हापूरला गेले. बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून सांगलीच्या महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. पुढील उच्च शिक्षण त्यांनी मुंबई विद्यापीठात पूर्ण केले. ८ सप्टेंबर २००६ रोजी ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनले. १९८३ मध्ये त्यांनी माजी न्यायाधीश ए.पी.शहा यांच्याकडे अधिवक्ता म्हणून कामाला सुरुवात केली होती. कराडचे पालक न्यायाधीश म्हणून त्यांनी त्यावेळी जबाबदारी पार पाडली. त्यानंतर त्यांची मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती.३० जुलै २०२२ पासून त्यांनी कॅटच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारली आहे.
सातार्यातील खटावसारख्या दुष्काळी तालुक्यातील निमसोड गावचे सुपूत्र रणजित मोरे यांच्या माध्यमातून मराठी माणूस न्याय व्यवस्थेतील उच्च पदावर विराजमान झाला. आता कॅटच्या (केंद्रीय प्रशासकीय लवाद) अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाल्यामुळे सातारा जिल्ह्यातील वकीलांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. रणजित मोरे यांनी कराडचे पालक न्यायाधीश म्हणून जबाबदारी पार पाडताना वकीलांच्या प्रश्नांची सोडवणूक केल्याचे कराडमधील वकीलांनी सांगितले.त्यांच्या माध्यमातून मराठी माणूस कॅटच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्याचा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया देखील वकीलांनी दिली