संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

महाराष्ट्राच्या ट्रकवर मध्य प्रदेशात हल्ला! गो-तस्करीचा आरोप! एकाचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

भोपाळ- मध्य प्रदेशच्या नर्मदापूरम येथे एक भयानक घटना घडली आहे. नर्मदापूर येथील एका गावातून विक्रीसाठी गायी घेऊन एक ट्रक रात्रीच्यावेळी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात येत होता. त्यावेळी गो-तस्करीचा आरोप करत दहा ते बारा लोकांच्या जमावाने तिघांना बेदम मारहाण केली. यात एकाचा मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सिवनी मालवा शहराजवळ बाराखड गावात ही घटना घडली. जवळपास 30 गायी या ट्रकमध्ये भरण्यात आल्या होत्या. या गायींना अमरावती आणि नागपुरात आणले जाणार होते. पण त्याआधीच नर्मदापूरमधीलच आजूबाजूच्या गावातील नागरिकांत गायींची तस्करी केली जात आहे आणि या गायींना कत्तलखान्यात घेवून जाणार आहेत, अशी खबर पसरली. त्यानंतर जमावाने रात्रीच्या सुमारास जाणार्‍या गायींच्या ट्रकला अडवले. ट्रकमध्ये खरंच गायी पाहून काहीजण संतापले. त्यांनी गाडीत असलेल्या तिघांना प्रचंड मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावाने त्या तिघांना इतकी मारहाण केली की त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या अंधारात हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या मारहाणीतील मृताचे नाव नजीर अहमद असे असून जखमीमध्ये शेख लाला व मुश्ताक यांचा समावेश आहे. शेख हा ट्रकचा चालक आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे.पोलिसांनी याप्रकरणी हत्या आणि गायींच्या तस्करीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान,नर्मदापुरम जिल्ह्यातील नांदेरवाडा गावातून या गायी अमरावती येथे नेल्या जात होत्या.या गायी विक्रीसाठी नेल्या जात होत्या.त्यांची कत्तलीसाठी तस्करी केली जात नव्हती, असे ट्रकचालक शेख लाला याने म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami