संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

महाराष्ट्रात ज्या-ज्या वेळी शिवसेना फुटली त्यात पवारसाहेब होते! केसरकरांचा गौप्यस्फोट

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक केसरकर यांनी आज दिल्लीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘महाराष्ट्रात ज्या-ज्या वेळेला शिवसेना फुटली त्यात पवारसाहेब होते, ही वस्तुस्थिती आहे’, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. ‘शिवसेनेसोबत लढायचे असेल तर, त्यांनी शिवसेना का फोडली आणि बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या याचे उत्तरसुद्धा पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिले पाहिजे, असे टीकास्त्र केसरकरांनी थेट दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून सोडले. त्याचबरोबर ‘स्वबळावर निवडून या’, असे आवाहनच त्यांनी शरद पवारांना केले.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना केसरकर म्हणाले, ‘मी स्वतः साक्षीदार आहे. या गोष्टी खरंतर सांगायच्या नसतात पण आज महाराष्ट्रामध्ये युद्ध आहे म्हणून सांगतो, पवार साहेब त्यावेळीसुद्धा अनेकवेळा मला विश्वासात घेऊन सगळं सांगायचे. त्यांनी सांगितले होते की, ‘जरी मी राणेंना बाहेर पडायला मदत केलेली असली तरी कुठल्या पक्षात जावे याची अट मी त्यांना घातलेली नाही.’ हा त्यांच्या मनाचा मोठेपणा निश्चितपणे आहे, परंतु याचा सरळ अर्थ असा होतो की, राणेंना बाहेर पडायला जे काही मार्गदर्शन, जी काही मदत होती ती त्यांनी केली. शिवाय भुजबळसाहेबांना तर ते स्वतः बाहेर घेऊन गेलेले होते आणि त्यांचे आशीर्वाद राज साहेबांच्या मागेसुद्धा होते. तेसुद्धा त्यांना मानतात. एक वडीलधारे नेतृत्त्व म्हणून सगळेच त्यांना मानतात. ज्यावेळी मी राणे साहेबांच्या विरुद्ध बंड केले होते त्यावेळी मी माझा राजीनामा दिला होता. तेव्हा शरद पवार भाषणात म्हणाले होते की, अनेक लोकांच्या डोक्यात सत्ता गेली आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार असताना मी २५ हजार मतांनी निवडून आलो आणि शिवसेनेचा उमेदवार असताना ४५ हजार मातांनी निवडून आलो होतो. मी २५ हजार मतांनी शिवसेनेलाच हरवलं होतं पण ४५ हजार मतांनी राष्ट्रवादीलाही हरवलं आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं डिपॉझिटसुद्धा जप्त झालं ही वस्तुस्थिती आहे, म्हणून जनतेला गृहीत कोणीच धरू नये, पवार साहेबांनीसुद्धा गृहीत धरू नये. त्यांनासुद्धा माहितीये जनता आपल्यापेक्षा श्रेष्ठ असते, लोकशाहीमध्ये जनतेला पाहिजे तेच झालं पाहिजे.’

‘शिवसेना आणि भाजपा नाही, तर एनसीपीने एकट्याने निवडून यायला पाहिजे होतं. सत्तेपासून ५ वर्ष लांब राहिले पण आता एनसीपीला अडीच वर्षांचं टॉनिक मिळालेलं आहे. मग स्वबळावर निवडून आणा ना. तुम्ही जाऊन प्रत्येक ठिकाणी भाषण करता की, पुढचा येणारा मुख्यमंत्री आमचाच असेल. मग हे शिवसेनेला मान्य आहे का? त्यांची प्रत्येक ठिकाणची भाषणं बघा, त्यांच्या प्रदेशाध्यक्षांची भाषणं बघा, त्यांना एनसीपीचा मुख्यमंत्री पाहिजे आणि ते मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसैनिक असतील, तर शिवसैनिकांना ते मान्य आहे का? याचा विचार शिवसैनिकांनी केला पाहिजे’, असे आवाहन केसरकरांनी यावेळी शिवसैनिकांना केले.

दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भातील बैठकीच्या आमंत्रणाबाबत बोलताना ते म्हणाले, ‘महाराष्ट्रामध्ये जे पसरवलं जातंय ते चुकीचं आहे. काही शिवसैनिकांनी मला फोन केला की उद्धव साहेबांना याचं निमंत्रण का नाही, तुम्हाला का? याचं उत्तर सांगतो की, राष्ट्रपतीपदाचा उमेदवार आजपर्यंत मातोश्रीवर गेलेला आहे पण मातोश्रीचा प्रतिनिधी कधीही उमेदवाराच्या बैठकीला गेला नाही. ही मातोश्रीची महती आहे आणि ती महती कायम ठेवण्याचं काम झालं पाहिजे, असं मानणाऱ्यांपैकी मी कार्यकर्ता आहे.’

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami