पुणे – पुण्यात दोन दिवसांचा मुक्काम केल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आता पुढील मार्गासाठी प्रस्थान झाले आहे.संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज हडपसर मार्ग दिवे घाट सर करून सासवड येथे मुक्कामी होती. तर संत तुकाराम महाराज यांची पालखी हडपसरमार्गे मांजरी करत लोणी काळभोर येथे मुक्कामी होती.दोन वर्षानंतर पायी वारी सोहळा सुरू झाल्यानंतर लाखो वारकरी दोन्ही पालख्यांमध्ये सहभागी झाले होते.संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने आज दिवे घाटातील अवघड वाट सर केला. तर दुसरीकडे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी लोणीमार्गे पंढरीकडे प्रस्थान केले.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दिवे घाटातून पुढे सरकत सासवडला पोचणार असल्यामुळे या पालखी मार्गातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.काल रात्री ११ वाजल्यापासून ते २६ जूनच्या रात्री ८ वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवे घाट व बोपदेव घाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. ही वाहतूक खडीमशीन चौक- कात्रज- कापूरव्होळमार्गे सुरू राहील. सासवड बाजूकडून येणारी सर्व वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे पुण्याकडे येईल. तसेच सासवड नंतर माउलींच्या पालखीचा पुढे जेजुरी आणि वाल्हे येथे मुक्काम असणार आहे. त्यामुळे रविवारी २६ आणि सोमवारी २७ जून या कालावधीत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी- पारगाव मेमाणे- सुपे- मोरगांव- नीरा या मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर वाल्हे येथून निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी सासवड- जेजुरी- मोरगांव या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
