मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी कळवा पोलिसांनी केलेली अटक बेकायदा ठरवण्याच्या मागणीसाठी सध्या अटकेत असलेली अभिनेत्री केतकी चितळे हिने उच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे.
पवारांवर टीका करणाऱ्या केतकीविरोधात आंदोलन झाली. तिच्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. केतकीला कळवा पोलिसांनी १४ मे रोजी अटक केली होती. सध्या ती तळोजा तुरुंगात आहे.
दरम्यान, आपल्याला झालेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे सांगत केतकी चितळे हिने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वी झालेली अटक ही बेकायदेशीर असल्याचा तिचा दावा आहे. पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाने अटक करण्याबाबत घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा दावाही केतकीने केला आहे. तसा उललेख तिने याचिकेत केला आहे. यापूर्वीदेखील गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी केतकीने याचिका केली असून ती प्रलंबित आहे. आधीच्या याचिकेत केतकीने जामिनावर सुटका करण्याचीही मागणीही केली होती. दरम्यान, बदनामी करणे, धर्म आणि वंशाच्या आधारे विविध समाजांमध्ये शत्रुत्व वाढवणे या आरोपांतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.