मुंबई- मानखुर्द रेल्वे स्थानकातील जुन्या फलाटावरून सीएसएमटीसाठी सुटणारी लोकल गाडी कोरोना काळापासून अद्याप बंद अवस्थेत असल्याने परिसरातील हजारो प्रवाशांची मोठी कुचंबणा झाली आहे.
या जुन्या फलाटाचे काही वर्षांपूर्वीच कोट्यावधी रुपये खर्च करून नूतनीकरण केले आहे.या फलाटावरून दररोज सकाळी ८.०५ आणि ८.५३ वाजता अशा दोन लोकल गाड्या सीएसएमटी सोडल्या जातात.पण सध्या याच गाड्या वाशी स्थानकातून सुटतात. त्यामुळे नेहमी ठराविक वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी कोंडी झाली आहे.मागील दोन वर्षांपासून या फलाटावरून गाडीच सोडली जात नसल्याने हा फलाट बेवारस स्थितीत पडून आहे.निर्मनुष्य बनलेल्या या फलाटाचा काही असामाजिक प्रवृत्ती आसरा घेऊ लागल्या आहेत.
तरी मानखुर्द गावठाण,
शिवाजीनगर,गोवंडी,चिता कॅम्प,पीएमजी कॉलनी, महाराष्ट्र नगर परिसरातील हजारो प्रवाशांनी या दोन्ही गाड्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी संबधित रेल्वे विभागाकडे केली आहे.