मुंबई – देशात अग्निपथ योजनेविरोधात आंदोलने सुरू असताना कोरोनाने पुन्हा भयावह स्थिती निर्माण केली आहे. दिल्ली आणि मुंबई शहरांमध्ये दररोज कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. शनिवारी मुंबईत कोरोनाचे २००० नवे रुग्ण आढळले, तर दिल्लीत कोरोनाचे १५०० हून अधिक नवीन रुग्ण आढळले. मुंबईत कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र सध्या कोरोनाचे केंद्रबिंदू बनताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, आदल्या दिवसाच्या तुलनेत दिल्ली आणि मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये किंचित घट झाली. काल शनिवारी महाराष्ट्रात कोरोनाचे ३ हजार ८८३ नवे रुग्ण आढळले. एकट्या मुंबईत कोरोनाचे २ हजार ०५४ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याआधी शुक्रवारी महाराष्ट्रात ४ हजार १६५ नवे रुग्ण आढळले होते. तर मुंबईत २ हजार २५५ रुग्णांची नोंद करण्यात आली होती.