मुंबई- काल पासून मान्सून कोकणात आल्याने राज्यातील अनेक भागात मान्सूनच्या सरी बरसत आहेत. काल पुणे, मुंबई, कोकणातील काही जिल्ह्यांसह उर्वरीत महाराष्ट्रात पावसाला सुरूवात झाली आहे. मान्सूनने दक्षिण कोकणात जोरदार हजेरी लावली आहे. गोव्यासह कोकणातील काही भागात मान्सूनला सुरूवात झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने झोडपले. मुंबई, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काल पावसाने हजेरी लावल्याने उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळाला आहे. दरम्यान मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याने राज्यात पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता आहे.
मुंबईतही मान्सून आज अखेर दाखल झाला आहे. आज डहाणू, मुंबई, ठाणे, रायगडसह महाराष्ट्रातील इतरही भागात पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान याबाबत हवामान विभागाचे अधिकारी होसाळकर यांनी ट्विट करत मुंबईत मान्सून दाखल झाल्याची माहिती दिली आहे .
कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आली आहे.मुंबई आणि उपनगरासह, पुणे, नाशिक, कोल्हापूर, या जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच पालघर जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. या पावसामुळे उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.पुढील दोन ते तीन दिवस लखलखाट तसेच गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसामुळे शेतकरी सुखावला असला तरी केळी व अन्य पिकांना पावसाचा फटका बसला आहे. . दरम्यान कालपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. विजाच्या कडकडाटाने पाऊस पडत असल्याने एका शेतकऱ्याचा वीज पडल्याने मृत्यू झाला आहे.