मुंबईत २० ऑक्टोबरपासून दोन शिफ्टमध्ये महाविद्यालये सुरू

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – राज्यातील महाविद्यालयांबरोबर मुंबईतीलही महाविद्यालये बुधवारी २० ऑक्टोबरपासून नियमित सुरू होणार आहेत. मात्र ती दोन शिफ्टमध्ये कोरोनाचे नियम पाळून सुरू केली जाणार आहेत. त्यासाठी मुंबई महापालिकेने नियमावली जाहीर केली आहे. त्यात क्षमतेच्या ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि शक्य त्या ठिकाणी दोन सत्रांमध्ये वर्ग भरण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना यात प्राधान्य आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

राज्यातील अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे आणि स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांची संलग्न विद्यालये २० ऑक्टोबरपासून नियमित सुरू होतील, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली होती. त्यानुसार बुधवारपासून महाविद्यालये सुरू होणार आहेत. त्यासाठी मुंबई महापालिकेने नियमावली जाहीर केली आहे. यात ५० टक्के क्षमतेने महाविद्यालये सुरू करण्यास सांगितले आहे. याशिवाय जिथे शक्य आहे तिथे दोन शिफ्टमध्ये महाविद्यालये सुरू करावी, अशी सूचना केली आहे. राज्य सरकारने महाविद्यालयांबाबत काढलेल्या नियमावलीत दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आणि इतरांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत. स्थानिक पातळीवर लसीकरण राबवण्यासही सांगितले आहे. पदवीच्या पहिल्या वर्षापासून पुढील अभ्यासक्रमाचे विद्यार्थी १८ वर्षे वयोगटातील असल्याने यातील अनेक विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले आहे. १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे त्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी मुंबईत महापालिका विशेष लसीकरण मोहीम राबवणार आहे. शहरात सुमारे साडेतीन लाख महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. यातील ९५ टक्के विद्यार्थी आणि शिक्षकांनी पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे त्यांना दुसरा डोस देण्यासाठी विशेष लसीकरण मोहीम महापालिका राबवणार आहे. महाविद्यालयांच्या शेजारी असलेली रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Close Bitnami banner
Bitnami