मुंबई – शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी आपल्या हद्दीत 8 एप्रिलपर्यंत कलम 144 म्हणजेच जमावबंदीचे आदेश लागू केले आहे. तसेच मोर्चा, मिरवणूक, वरात आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावरही बंदी घातली असून ड्रोन उडवण्यास देखील पोलिसांनी मनाई केली आहे.
पोलिसांनी अचानक जवळपास 18 दिवसांची जमावबंदी का लागू केली, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. हा निर्णय केवळ मुंबईतील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घेण्यात आल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांनी मुंबईच्या हद्दीत 8 एप्रिल 2022 पर्यंत जमावबंदी आदेश जारी केले असून पॅराग्लायडर्स, बलून, पतंग उडवणे, उंच जाणारे फटाके तसेच लेसर प्रकाश (बीम) यास प्रतिबंध आधीच करण्यात आला आहे. मुंबईत 8 एप्रिलपर्यंत लागू करण्यात आलेल्या जमावबंदीच्या नियमातून काही गोष्टी वगळण्यात आल्या आहेत. यामध्ये विवाह समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, सहकारी संस्था आणि अन्य संस्थांच्या बैठका, क्लबमध्ये होणार्या बैठकांना वगळण्यात आले आहे. चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणार्या गर्दीवरही कोणतेही निर्बंध नसतील.