संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

मुंबई , नवी मुंबई पालिकांची ओबीसी आरक्षण सोडत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला मान्यता दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांना निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणाची नव्याने सोडत काढण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार उद्या शुक्रवारी २९ जुलै २०२२ रोजी मुंबई, नवी मुंबई आणि वसई-विरार महापालिकांमध्ये ओबीसी आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. मुंबईतील ९ वाढीव प्रभागांमुळे ६३ जागांवर ओबीसी आरक्षण जाहीर होणार आहे. नवी मुंबई पालिकेत २०.५ टक्के ओबीसी आरक्षण लागू झाले आहे. त्यामुळे तेथे २५ जागांसाठी ओबीसी आरक्षण जाहीर होणार आहे. त्याची सोडत उद्या शुक्रवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात काढली जाणार आहे. वसई-विरार महापालिकेत २७ टक्के ओबीसी आरक्षण आहे. तेथे ३४ जागांसाठी ओबीसी आरक्षण जाहीर होणार आहे.

महापालिका निवडणुकांसाठी एक आठवड्यात नव्याने सोडत काढण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने पालिकांना दिले होते. त्यानुसार उद्या २९ जुलैला मुंबई महापालिका ओबीसी आरक्षण सोडत काढणार आहे. मुंबईत यावेळी ९ प्रभाग वाढले आहेत. त्यामुळे एकूण प्रभागांची संख्या २३६ झाली आहे. ३१ मे रोजी मुंबई महापालिकेने प्रभाग आरक्षण जाहीर केले होते. परंतु त्यात ओबीसी आरक्षणाचा समावेश नव्हता. मुंबईतील २३६ प्रभागांपैकी ११८ महिलांसाठी तर ११८ पुरुषांसाठी राखीव आहेत. त्यात लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीसाठी १५ आणि त्यातील ८ महिलांसाठी, अनुसूचित जमातीसाठी २ त्यातील एक महिलेसाठी आरक्षित म्हणून जाहीर झाला आहे. आता नवीन सोडतीत ओबीसी आरक्षणाचा समावेश केला आहे. परंतु या आरक्षणावर त्याचा परिणाम होणार नाही. ६३ जागांवर ओबीसी आरक्षण जाहीर होणार आहे. २०१७ च्या पालिका निवडणुकीत पालिकेचे २२७ प्रभाग होते. त्यावेळी ६१ जागा ओबीसींसाठी आरक्षित होत्या. यावेळी ९ प्रभाग वाढल्यामुळे ओबीसींच्या जागाही ६३ पर्यंत वाढल्या आहेत. त्यातील ३२ जागा महिलांसाठी राखीव आहेत. बांठिया आयोगाच्या अहवालानुसार नवी मुंबईत २०.५ टक्के ओबीसी आरक्षण लागू झाले आहे. तेथे १२२ मधील २५ जागा ओबीसींसाठी आरक्षित ठेवल्या जाणार आहेत. त्यांची सोडत उद्या शुक्रवारी काढली जाणार आहे. यापूर्वी महापालिकेने आरक्षण सोडत जाहीर केली आहे. त्यात अनुसूचित जातीसाठी ११, अनुसूचित जमातीसाठी २ आणि सर्वसाधारण १०९ अशा एकूण १२२ जागांची विभागणी केली होती. मात्र आता त्यात ओबीसी आरक्षणाची भर पडली आहे. तथापि पूर्वीचे आरक्षण कायम राहणार आहे. वसई-विरार महापालिकेत २७ टक्के ओबीसी आरक्षण लागू झाले आहे. त्यानुसार तेथे ३४ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. त्यातील १७ जागा ओबीसी महिलांसाठी आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami