ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्याला आता नवे स्वरूप प्राप्त होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली आहे. बंगल्याबाहेरील ६ फुटांची भिंत तोडण्यात आली असून आता इथे १० फुटांची भिंत बांधण्यात येत आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नंदनवन बंगल्याच्या भिंतीची उंची वाढवण्यात येत आहे.या बंगल्याच्या चारही बाजुंनी कुंपण घालण्यात येणार आहे.हे काम पूर्ण करण्यासाठी २ ते ३ दिवस लागणार आहेत. शिवसेनेतून बंडखोरी करीत मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे अजून वर्षा या शासकीय निवासस्थानी राहण्यासाठी गेलेले नाहीत. ते त्यांच्या नंदनवन, तसेच अग्रदूत या शासकीय बंगल्यावरूनच मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार चालवत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री हे वर्षा निवासस्थानी जाणार नसून नंदनवन बंगल्यातच त्यांच्या शासकीय बैठका पार पडतील अशी चर्चा करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हे कुंपण घालण्यात येत आहे. रस्त्यालगत बंगला असल्याने आतील हालचाली दिसू नयेत, यासाठी बंगल्याला चारही बाजूने कुंपण घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.