मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत रिक्षा संघटनांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले. त्यामुळे कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघातर्फे संप मागे घेतला आहे. येत्या १० ते १५ दिवसांमध्ये बैठक न झाल्यास आंदोलन केले जाईल, अशी माहिती महासंघातर्फे शनिवारी देण्यात आली. देशासह राज्यात सीएनजीचे दर वाढत असताना रिक्षा, टॅक्सीचे भाडे पूर्वीप्रमाणे आहे.
मुंबईत सध्या टॅक्सीचे पहिल्या दीड किलोमीटरसाठी किमान भाडे २५ रुपये इतके आहे. त्यापुढे प्रत्येक किलोमीटर मागे १६.९३ प्रमाणे दर आकारला जातो. तर रिक्षाचे पहिल्या दीड किलोमीटरसाठी किमान भाडे हे २१ रुपये असून त्यापुढे प्रत्येक किलोमीटर मागे १४.२० रुपये प्रमाणे दर आकारला जातो.
भाडेवाढीसह रिक्षा, टॅक्सीचे परमिट वाटप बंद करणे व इतर मागण्या शुक्रवारपर्यंत मान्य न झाल्यास महासंघाने ३१ जुलैच्या मध्यरात्रीपासून कोकण विभागातील रिक्षा, टॅक्सी बेमुदत बंद करण्याचा इशारा दिला होता. या संघामध्ये सुमारे अडीच लाख रिक्षाचालक सहभागी होणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु, महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री शिंदे यांची मुंबईत भेट घेत मागण्यांबाबत चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लवकरच बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्यामुळे महासंघाने आंदोलन स्थगित केल्याचे पेणकर यांनी सांगितले.