श्रीनगर : खराब हवामान आणि जम्मू-श्रीनगर नॅशनल हायवेच्या खराब स्थितीमुळे जम्मूहून निघालेली अमरनाथ यात्रा शुक्रवारी थांबवण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणत्याही नव्या तुकडीला जम्मूहून बेस कॅम्पकडे जाण्याची परवानगी नाही.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामबन जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि दगड पडल्यामुळे बंद झालेला राष्ट्रीय महामार्ग गुरुवारी रात्री एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.यात्रा व्यवस्थापनाशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिलेल्या महितीनुसार,महामार्गाची खराब स्थिती आणि खराब हवामान पाहता जम्मूहून निघणारी अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. याआधी १० आणि ११जुलैलाही खराब हवामानामुळे जम्मूहून अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा खराब हवामानामुळे यात्रा पुन्हा स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान, महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाल्यास, शुक्रवारी संध्याकाळपासून जम्मूहून पुन्हा एकदा प्रवासाला परवानगी दिली जाऊ शकते, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.