संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

मेळघाटात दीडशे फूट खोल दरीत जीप कोसळून अपघात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अमरावती -मेळघाटच्या धारणी तालुक्यातील आदिवासी भागात भाजीपाला विक्रीसाठी नेणारे चारचाकी वाहन भरधाव वेगात असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे राणीगाव जवळील दीडशे फूट दरीत कोसळले. या भीषण अपघातात जवळपास 4 ठार तर 8 गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जखमींना धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

धारणी तालुक्यातील सुसर्दा येथे बुधवारी मोठा आठवडे बाजार भरतो. हा बाजार मोठा असल्याने या ठिकाणी काही शेतकरी हे आपला शेतमाल विकण्यासाठी आणत असतात. अकोट हिवरखेड येथील काही शेतकर्‍यांनी त्यांचा शेतमाल हा विक्रीसाठी आणला होता. बाजारातील व्यवहार पूर्ण झाल्यावर संध्याकाळच्या सुमारास परत जात होते. यावेळी राणीगावनंतर असलेल्या जंगलातील घाट वळणाच्या उतार रस्त्यावर या गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने हे वाहन एका झाडाला धडकून दरीत कोसळले. यानंतर हे वाहन थेट एका झाडाला जाऊन अडकले. या दुर्घटनेत चालक केशव शिवाजी बनसोड (रा. अडगाव), सय्यद समशेर (रा. अकोट) यांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी दोघांचा दवाखान्यात नेत असताना मृत्यू झाला. त्यांची नावे समजू शकली नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आघातात शरीफ खान, सरदार खान रेडिमेड वाले (38), जरीफ खान शब्बीर खान चाबीवाले (32), प्रफुल हरोडे ऊर्फ पिंटू (50), समीर बेग अकबर बेग (35), श्रीकृष्ण श्यामराव कोथडकर (47), सय्यद जाफर (40, सर्व रा. अकोट व हिवरखेड) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घाटातील रस्त्यांची दुरावस्था असल्यामुळे याठिकाणी अपघाताच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. यासोबतच प्रवास करण्यासाठी वाहनांची सोयही नसल्याने उपलब्ध वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसतात. रस्त्याची दुरावस्था आणि अतिप्रवासी यामुळे अनेकदा नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. या दोन्ही कारणांमुळे चालकांचे गाडीवरील नियंत्रण सुटण्याची शक्यताही अधिक असते. यामुळे घाटात अनेकदा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami