श्रीनगर : अमरनाथ यात्रेशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. अमरनाथ गुहेतील मिळालेल्या ताज्या छायाचित्रानुसार गुहेतील शिवलिंग विलीन झाले असल्याचे समोर आले आहे. ३० जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू झाली होती. यंदा अमरनाथ यात्रा १२ ऑगस्टपर्यंत संपणार असतानां, त्यापूर्वीच शिवलिंग विलीन झाल्यामुळे भाविकांना आता दर्शन घेता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवलिंग विलीन होण्याची नेमकी कारणे तपासली जात आहेत. त्यानुसार, अचानक वाढलेले तापमान आणि भाविकांची गर्दी यामुळे शिवलिंग विलीन होत असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय ढगफुटी आणि अचानक आलेला पूर हे देखील कारण असल्याचे मानले जात आहे.
विशेषतः यात्रेपूर्वी शिवलिंग विलीन होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या अनेक वर्षांपासून यात्रा पूर्ण होण्याआधीच बर्फाळ शिवलिंग विलिन होत असल्याचे पहायला मिळाले आहे. मात्र आतापर्यंत १ लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असल्याची माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान, अमरनाथमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे येथील परिस्थिती बिकट झाली होती. ढगफुटीत १६ जणांचा झालेला मृत्यू , तसेच अद्याप ४० हुन अधिक लोक बेपत्ता असल्यामुळे यात्रा स्थगितही करण्यात आली होती. त्यानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफने युद्धपातळीवर मदतकार्य सुरु करण्यात आले. ११ जुलैपासून अमरनाथ यात्रेला पंजतरणी येथून सुरुवात करण्यात आली होती. यावेळी अमरनाथ यात्रा १२ ऑगस्टला संपणार होती. मात्र त्यापूर्वीच शिवलिंग विलीन झाल्यामुळे भाविकांना आता दर्शन घेता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे