मुंबई- संजय राऊत यांनी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत फक्त दोनच मंत्री असल्याने त्यांनी घेतलेले निर्णय अवैध असल्याचा दावा केला आहे. यावर भाजपच्या आशिष शेलार यांनी अहो तुम्हाला कायदा, संविधान काही तरी कळते का? असा सवाल केला आहे. खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे.
संजय राऊत यांनी आपल्या पोस्ट मध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम १६४(१अ)चा दाखला देत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. राऊतांनी सवाल केला आहे की, ‘राज्यपाल, हे काय सुरू आहे?’ राऊत म्हणतात, की भारतीय राज्यघटनेच्या कलम १६४(१अ) नुसार राज्याचे मंत्रीमंडळ किमान १२ मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येचा मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले २ आठवडे महाराष्ट्रात २ मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही.
आशिष शेलार यांनी देखील संजय राऊत यांना कायद्याच्या भाषेत उत्तर दिले आहे. शेलार म्हणतात, महाविकास आघाडीत ७ जणांच्या मंत्रिमंडळाने ३२ दिवस निर्णय घेतले आणि आता म्हणे संविधानाचे अनुच्छेद १६४(१अ)सांगते १२ सदस्यांचे मंत्रिमंडळ हवे! अहो तुम्हाला कायदा, संविधान काही तरी कळते का?
संविधानातील हे कलम मंत्रिमंडळाचा आकार किती असावा, याच्याशी संबंधित आहे. विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येपेक्षा १५% अधिक मंत्री नको,पण असे करताना किमान १२ असा त्याचा अर्थ आहे. उदा. गोवा अशा लहान राज्यांसाठी ही तरतूद. तेथे नियमाने केवळ ६ मंत्री होऊ शकतात. पण या नियमाने १२ आहेत. विस्ताराच्या कालावधीचा या संविधानाच्या कलमात कुठेही उल्लेख नाही. अज्ञान आणि विपर्यासाचा काळ संपलाना मा. खासदार संजय राऊतजी असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.