लखनौ – ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपला गळती लागली आहे. स्वामी प्रसाद मौर्य आणि दारासिंह या दोन मंत्र्यांच्या पाठोपाठ आज धरमसिंह सैनी या आणखी एका मंत्र्याने आणि दोन आमदारांनी राजीनामा दिला आहे. सैनी यांनी राजीनामा दिल्यानंतर समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.
स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर भाजपात मोठी फुट पडेल असे सांगितले जात होते. त्यामुळे स्वतः अमित शहा यांनी निवडणुकीची सूत्रे हाती घेतली होती. त्यासाठी कोअर कमेटीची बैठक घेऊन तब्बल १० तास चर्चा केली . या बैठकीत जे नाराज आहेत त्यांना कसे रोखायचे यावर चर्चा झाली होती. पण अमित शहा यांना अपयश आले आणि आज धरमसिंह सैनी यांनी राजीनामा दिला. तसेच त्यांच्या सोबत बिधुना मतदार संघाचे आमदार विनय शक्य आणि शिकोहाबाद्चे आमदार मुकेश वर्मा या दोन आमदारांनी राजीनामा दिला.
धरमसिंह सैनी हे योगी मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते आणि सहरांन पूरच्या नाकुर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपचे जातीय समीकरण बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान सैनी यांनी आपला राजीनामा राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे सुपूर्द केला असून आपला बंगला आणि गाडीही सोडली आहे.
भाजपला लागलेली ही गळती रोखण्यासाठी सध्या जोरदार हालचाली सुरु असून अमित शहा यांनी समाजवादी पक्षाला धडा शिकवण्यासाठी त्यांचेही काही आमदार फोडण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.