संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

रतलाम-मुंबई रेल्वे मार्ग बंद; मालगाडीचे १६ डबे रुळावरून घसरले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

दाहोद – मध्य प्रदेश आणि गुजरातला जोडणाऱ्या पश्चिम रेल्वेवरील रतलाम रेल्वे विभागात चार दिवसांत दोन मोठे रेल्वे अपघात झाले. काल रात्री उशिरा दिल्ली-मुंबई मार्गावरील दाहोदजवळ मालगाडीचे १६ डबे रुळावरून घसरून एकमेकांना आदळले. अपघातात रुळावरील ओव्हरहेड वीजवाहिनीही तुटली. परिणामी दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून येथील सर्व गाड्या भोपाळ आणि चित्तोडगड मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

दिल्ली-मुंबई मार्गावर रात्री १२.४० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे कळते. गुजरात राज्यातील दाहोदजवळील मंगल महुडी आणि लिमखेडा या स्थानकांदरम्यान ही घटना घडली. मालगाडीची चाके डब्यांपासून वेगळी झाली होती, यावरून अपघाताच्या तीव्रतेचा अंदाज येतो. मालगाडीचे आठ डबे अप आणि आठ डबे डाऊन मार्गावर घसरून पडले होते. त्यामुळे नवी दिल्ली-मुंबई राजधानी, ऑगस्ट क्रांती राजधानी, गरीब रथ, सोमनाथ जबलपूर एक्सप्रेस, मुंबईहून इंदूरकडे जाणारी अवंतिका एक्सप्रेस, मुंबई-जयपूर एक्सप्रेस, पुणे-इंदूर एक्सप्रेस, जबलपूर-सोमनाथ एक्सप्रेस या मार्गावर थांबवण्यात आल्या. तर काही गाड्या वेगळ्या मार्गावर वळवल्या.

अपघाताबाबत कळताच रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी मदत पथकासह घटनास्थळी रवाना झाले होते. त्यांच्यासोबत यांत्रिक, अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल, इत्यादी विभागाचे अधिकारीदेखील तिथे पोहोचले. आज पहाटे साडेपाच वाजल्यापासून रुळावरून घसरलेले डबे उचलण्यास सुरुवात झाली. दरम्यान, रतलाम रेल्वे विभागात गेल्या चार दिवसांतील हा दुसरा मोठा रेल्वे अपघात आहे. याआधी इंदूर-उदयपूर एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले होते. या अपघाताची चौकशी सुरू असतानाच दिल्ली-मुंबई मार्गावर आणखी एक मोठा अपघात झाला. या अपघातामुळे सुमारे २३ गाड्यांवर परिणाम झाला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami