पुणे – राज्यात शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाड्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यानंतर आज रविवारी, २६ जून रोजी हवामान विभागाने कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, नंदूरबार, धुळे, जळगाव, नगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मान्सून सध्या दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टी लगत सक्रिय आहे. तर पश्चिम किनाऱ्यावर सक्रिय असलेल्या समांतर कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता काहीशी वाढली आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत अरबी समुद्रावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती अद्याप कायम असून झारखंड ते विदर्भ हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी विदर्भ आणि कोकणात पुढील चार दिवस मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता आहे.