मिरज – सांगलीमध्ये एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली आणि संपूर्ण राज्य हादरले. मिरजेपासून १२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये ही घटना घडली. पोलीस तपासात या आत्महत्येमागील प्रमुख कारण समोर आले आहे, जे अधिकच धास्तावणारे आहे. राईस पुलिंगच्या नादाने कर्जात बुडालेल्या वनमोरे बंधूंनी विष घेऊन आत्महत्या केल्याचे कळते आहे. याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही, मात्र पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, या सामूहिक आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे, तर २५ जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
गावातील लोकांच्या माहितीनुसार, वनमोरे बंधूंना राईस पुलिंगचा नाद लागला होता एका टोळीने त्यांना याबाबत फूस लावली होती. त्यांच्या आमिषाला बळी पडून माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे या दोन भावांनी अनेकांकडून पैसे उसणे घेतले होते. गळ्याभोवती कर्जाचा अक्षरश: फास झाल्यानंतर रविवारी रात्री त्यांनी कुटुंबियांसह विष पिऊन जीवन संपवले. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे दोघे वेगवेगळ्या घरात राहत होते. एका ठिकाणी सहा जणांचे तर दुसऱ्या ठिकाणी तिघांचे मृतदेह आढळले. मृतांमध्ये त्यांच्या आई, पत्नी आणि मुलांचा समावेश आहे. माणिक येलाप्पा वनमोरे (डॉक्टर), आक्काताई वनमोरे (आई), रेखा माणिक वनमोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा), पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) अशी मृतांची नावे आहेत. माणिक आणि पोपट यांच्या खिशात पोलिसांना दोन चिठ्ठ्या सापडल्या. त्यामध्ये अनेकांची नावे आहेत. त्यांनी सावकारी कर्ज घेतले होते. व्यापारासाठी कर्ज घेतले होते, असे या चिठ्ठीत नमूद केलेले आहे.
वाचकांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की राईस पुलिंग म्हणजे नेमेके काय? तर, राईस म्हणजे तांदूळ आणि पुलिंग म्हणजे ओढणे. राईस पुलर म्हणजे एक असा धातू, वस्तू किंवा भांडं जे मौल्यवान असल्याचा दावा केला जातो. त्याची किंमत कोट्यवधी रुपये असून नासासारख्या संस्था त्याचा उपयोग करतात. राईस पुलरच्या मदतीने उपग्रह आणि अवकाशात ऊर्जा निर्माण केली जाते. अनेकजण लालसेपोटी कोट्यवधी रुपये खर्च करून राईस पुलर विकत घेतात. व्यवसायात वृद्धी होईल, संपत्ती वाढेल अशा थापांना बळी पाडून राज्याच्या ग्रामीण भागात राईस पुलिंगच्या नावाखाली अनेकांना गंडा घातला जातो.