रत्नागिरी- कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात आज पहाटे ५ च्या सुमारास पुन्हा दरड कोसळली. त्यामुळे घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावर कोसळलेली दरडी हटवल्यानंतर काही तासांनी एकेरी आणि दुपारनंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. या दुर्घटनेमुळे रत्नागिरी येथून राजापूर-कोल्हापूर मार्गे पुण्याला जाणारी एसटी बस घाटात अडकली होती.
कोकण आणि परिसरात पडत असलेला पावसामुळे येथील अनेक घाटांत दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. आज पहाटे ५ च्या सुमारास अनुस्कुरा घाटात दरड कोसळली. याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने दरडी हटवण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे काही वेळानंतर एकेरी वाहतूक सुरू झाली. दुपारनंतर घाटातील वाहतूक पूर्ण सुरू झाली. ४ दिवसांपूर्वी याच घाटात दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली होती. आज पहाटे पुन्हा दरड कोसळली. त्यामुळे सकाळी घाटात वाहतूक कोंडी झाली होती.