पुणे – महाराष्ट्रातील पहिले आणि पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कासारसाई धरणाच्या कडलेला उभारण्यात आलेले हवेतील हॉटेल म्हणजे ‘स्काय डायनिंग’ हॉटेल हे आता वादाचा भोवऱ्यात सापडले आहे. कारण पिंपरी पोलिसांनी या हॉटेल मालकाला नोटीस बजावली आली आहे.त्यानंतर हे हॉटेल मालकाने बंद केले आहे.आवश्यक त्या परवानग्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिले आहेत.
राज्यातील पहिले स्काय डायनिंग हॉटेल म्हणून हे हॉटेल प्रसिद्धीच्या झोतात आले होते.अनेक जणांनी या ठिकाणी जाऊन स्काय डायनिंग करण्याचा आनंद देखील घेतला होता. ग्राहकांना काही तरी वेगळे द्यावे,अशी संकल्पना या हॉटेल मालकाची होती. मात्र पोलिसांकडून हे हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश नोटिसद्वारे देण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या हॉटेलचे उद्घाटन केले होते.१२० फुटावर जाऊन जेवणाचा आगळा वेगळा आनंद या हॉटेलममधून घेता येत होता. मात्र १२० फुटावर जाऊन जेवणाची सोय करणे अत्यंत धोकादायक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
जेव्हापासून या हॉटेलचे उद्घाटन झाले तेव्हापासून या हॉटेलची जोरदार चर्चा होती. काय वेगळे देता येईल, या उद्देशाने हे हॉटेल सुरू करण्यात आले होते. मात्र आवश्यक त्या कोणत्याही परवानग्या हॉटेल मालकाने घेतल्या नसल्याचे पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.त्यामुळे राज्यातील पहिले स्काय डायनिंग हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या हॉटेलात स्काय डायनिंगवर एकच वेळी २२ जण बसतात आणि ते जेव्हा १२० फुटावर वर जातात, तेव्हा तो टेबल ३६० डिग्री मध्ये फिरतो.यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने सर्वच काळजी घेतली जाते. पर्यटकांना बेल्ट लावणे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सर्व माहिती यावेळी दिली जाते. या हॉटेलमध्ये विशेष म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन्ही प्रकार पर्यटकांना खायला मिळतात. या हॉटेलचा अनुभव घेतलेल्या काही जणांनी सांगितले की, ‘ १२० फुटांवर जाऊन जेवण करण्याचा अनुभव हा खूपच वेगळा अनुभव आहे. विशेष म्हणजे एवढ्या उंच ठिकाणी जाण्यासाठी विशेष सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे.जमिनीवरून जसजस वर जात होतो तशी भीती होती,पोटात गोळा आला होता.पण सीटबेल्ट लावण्याने आम्ही निर्धास्त होतो.”